अखेर ‘गेम’ झाला, वनराज आंदेकरच्या खुनाचा घेतला बदला? नाना पेठेत गणेशोत्सवात मर्डर
pune-gang-war-nana-peth-youth-murder-andekar-ganesh-visarjan
पुणे │ शनिवारी (६ सप्टेंबर) होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला सुरूवात झाली असताना, त्याच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नाना पेठ परिसरात गँगवॉरची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात गोविंद कोमकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मृत गोविंद कोमकर हा गणेश कोमकर याचा मुलगा असून, गणेश कोमकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे. त्यामुळे या हत्येचा संबंध जुन्या वैमनस्यातून असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घटना शुक्रवारी (५ सप्टेंबर) रात्री घडली. अज्ञात हल्लेखोरांनी गोविंदवर अंदाजे तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण पसरलं आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. लवकरच आरोपींना अटक होईल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर झालेल्या या गँगवॉरमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.