दौंडच्या यवतमध्ये पोस्टवरून वाद; जमावाकडून दगडफेक, पोलिसांचा बंदोबस्त
पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून दोन समाजांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला. शुक्रवारी सकाळी व्हॉट्सॲपवर एका समुदायाच्या तरुणाने केलेल्या पोस्टमुळे संतापलेले नागरिक रस्त्यावर उतरले. परिणामी दोन्ही गटांमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि धार्मिक स्थळांवर हल्ल्याच्या घटना घडल्या.
या घटनेनंतर गावातील आठवडी बाजार बंद करण्यात आला. काही दुचाकींना आग लावण्यात आली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत दंगलग्रस्त परिसरात अश्रुधुराचा वापर करत जमाव पांगवला. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या माहितीनुसार, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप गिल यांनी स्वतः यवतला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, जमावाने काही ठिकाणी तोडफोड केली, मात्र मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाल्याचा दावा खोटा आहे. काही ठिकाणी फक्त काचा फुटल्या आहेत. पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवून गावात शांतता प्रस्थापित केली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या आठवड्यात नीळकंठेश्वर मंदिरातील कथित अवमानाच्या घटनेमुळे यवतमध्ये आधीच तणाव होते. त्यानंतर लगेचच पुन्हा ही घटना घडल्याने परिसरातील वातावरण अधिकच पेटले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त कायम आहे