पुणे – भाजपचे पुणे शहराचे महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलिस निरीक्षकाने विनयभंगाचा आरोप करत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (ता. २३) शनिवार वाड्याजवळ एका कार्यक्रमानिमित्त भाजप नेते जमले होते. या कार्यक्रमानंतर कसबा पेठचे आमदार हेमंत रासने यांनी काही कार्यकर्ते आणि बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांना जवळच्याच एका दुकानात चहा प्यायला नेले.

चहाच्या दुकानात असताना, प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेत त्या महिला पोलिस निरीक्षकाला दोन वेळा अशोभनीय पद्धतीने स्पर्श केला, असा आरोप आहे. संबंधित महिला अधिकाऱ्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली.

महिला निरीक्षकाच्या तक्रारीनंतर पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. यानुसार, कोंढरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, प्रमोद कोंढरे यांनी प्रसिध्दिपत्रक जारी करत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. हा प्रकार गैरसमजुतीमधून घडल्याचा दावा त्यांनी केला असून, याआधीही त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवलेला असल्याचे उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *