सुप्रीम कोर्टाबाहेर वकिल आणि डॉग लव्हर्समध्ये वाद
दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महानगरपालिकांना तत्काळ कुत्रा शेल्टर बांधण्याचा आदेश दिला. या शेल्टरमध्ये कुत्र्यांना पकडणारे प्रशिक्षित कर्मचारी, नसबंदी व लसीकरण सुविधा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
“हा आदेश जनहितासाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या भावनांना येथे स्थान नाही. तात्काळ कारवाई करा,” असे न्यायमूर्ती पारदीवाला यांनी सांगितले. त्यांनी सर्व भागांतून कुत्रे उचलून शेल्टरमध्ये हलवण्याचे निर्देश दिले.
अलीकडेच दिल्लीमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे रेबीज मृत्यूच्या घटनांत वाढ झाली आहे. मात्र, हा आदेश प्राणीप्रेमींना पसंत पडलेला नाही. माजी केंद्रीय मंत्री आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी हा आदेश “अव्यवहार्य”, “आर्थिकदृष्ट्या अशक्य” आणि “पर्यावरणीय समतोलासाठी घातक” असल्याचे सांगितले.
“दिल्लीमध्ये सुमारे तीन लाख भटके कुत्रे आहेत. त्यांना रस्त्यावरून हटवण्यासाठी ३,००० शेड्स लागतील, ज्यासाठी पाणी, निचरा, स्वयंपाकघर आणि वॉचमन यांची सोय करावी लागेल. याचा खर्च सुमारे १५,००० कोटी रुपये येईल. दिल्लीकडे एवढे पैसे आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, बुधवारी भारताचे मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई यांनी समाजातील विविध स्तरांतून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या आदेशाचा पुनर्विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
या आदेशानंतर ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाबाहेर प्राणीप्रेमी आणि वकिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक वकील एका व्यक्तीला पकडून त्याला मारहाण करताना दिसत आहे. संतप्त वकील त्या व्यक्तीला दोनदा थप्पड मारतो, त्यानंतर उपस्थित लोकांनी मध्ये येऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये लोक ओरडताना आणि वकिलांना शिवीगाळ करताना ऐकू येत आहे.