जम्मूमध्ये पूल कोसळल्याने वाहतूक ठप्प, प्रशासन सतर्क
जम्मूमध्ये सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तवी नदीला प्रचंड पूर आला आहे. या पुराच्या तडाख्यात मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी चौथा तवी पूल कोसळला. नदीच्या प्रचंड लाटांमुळे पूलाचा मोठा भाग वाहून गेला.
या दुर्घटनेची थरारक दृश्ये स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून ती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अचानक पूलाचा काही भाग नदीत कोसळल्याने परिसरात गोंधळ उडाला. मात्र या घटनेत जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सध्या प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक बंद केली असून बचावकार्य सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नदी सतत धोक्याच्या पातळीवर असल्याने प्रशासनाने नागरिकांना तवी नदीच्या परिसरात जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे.