महिलेची चैन चोरून चोर पसार – स्टेशनवर सुरक्षेचा फज्जा!
चेन्नई – चेन्नईच्या तारामणी रेल्वे स्टेशनवर भरदिवसा एका महिलेची चेन चोरून चोरट्याने पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, सोशल मीडियावर ती सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काही वेळ स्टेशन परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना दिसतो. त्यानंतर तो एका महिला प्रवाशाजवळ जाऊन काही वेळ तिथेच बसतो. संधी साधून अचानक तिच्या गळ्यातील चेन ओढून तो तिथून पळून जातो. महिलेला काही कळायच्या आतच आरोपी पसार होतो.
या प्रकारामुळे स्टेशनवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अशा घटनांबाबत तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.