मुठा नदीला पूर; भिडे पुलासह नदीकाठचे रस्ते जलमय
पुणे – शहरातील भिडे पुल पुन्हा एकदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे. मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुलाखालील व आजूबाजूचे सर्व रस्ते जलमय झाले असून वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.
नदीपात्रातील सगळे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने सतर्कता बाळगून पाणीपातळीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भविष्यात आणखी पावसाची शक्यता वर्तवली गेल्याने नदीकाठच्या परिसरात रहिवासी आणि दुकानदारांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.