मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रस्ते जलमय, वाहतूक विस्कळीत
मुंबई : मुंबईत सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर ठप्प झाले आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, उपनगरी रेल्वेसेवाही विस्कळीत झाली आहे. विक्रोळी, कुर्ला, दादर, सायन, अंधेरीसह अनेक भागांत रात्रभर जोरदार पाऊस झाला.
सकाळच्या ऑफिस वेळेत प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. रस्त्यांवरील वाहतूक मंदावल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
हवामान खात्याने मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने नागरिकांना शक्यतो घराबाहेर पडू नये, अशी सूचना केली आहे.