Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

दिल्लीत विजेचा खांब कोसळला, स्कूटरस्वार महिला चमत्कारिकरित्या बचावली

दिल्लीत विजेचा खांब कोसळला, स्कूटरस्वार महिला चमत्कारिकरित्या बचावली

दिल्ली – पश्चिम दिल्लीतील टिळक नगरमधील टागोर गार्डन परिसरात एक मोठा अपघात टळला आणि स्कूटरवरून प्रवास करणारी महिला थोडक्यात बचावली. रस्त्याच्या कडेला उभा असलेला विजेचा खांब अचानक कोसळून महिलेच्या अंगावर पडला. सुदैवाने आजूबाजच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत तिची सुटका केली.

ही घटना सोमवारी संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता घडली. टागोर गार्डनमधील एडी ब्लॉक परिसरात रस्त्यालगत उभे असलेले दोन विजेचे खांब अचानक तुटून रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी एक महिला स्कूटरवरून जात होती, आणि यातील एक खांब थेट तिच्यावर कोसळला. सुदैवाने तिने हेल्मेट घातले होते आणि ती किरकोळ जखमी झाली. तिचा जीव थोडक्यात वाचला.

ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की स्कूटरवरून जाणाऱ्या महिलेवर विजेचा खांब कोसळतो. कोसळतानाच खांबातील तारांमधून ठिणग्या उडताना दिसतात. महिला काही वेळ पोलखाली अडकलेली दिसते, पण काही क्षणातच स्थानिक नागरिक घटनास्थळी धाव घेतात आणि मदत कार्य सुरू करतात.

वीज विभागास तत्काळ माहिती

घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ वीज विभागाला माहिती दिली. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि सुरक्षेच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर स्कूटर पोलखालून बाहेर काढण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे.

ही घटना सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर मानली जात असून परिसरातील नागरिकांनी विजेच्या खांबांची नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे.

 

Exit mobile version