Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

उरण बोट दुर्घटना : समुद्राच्या लाटांमध्ये हेलकावे खात बोट बुडाली.

उरण बोट दुर्घटना : समुद्राच्या लाटांमध्ये हेलकावे खात बोट बुडाली.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, उपनगर आणि सागरी किनाऱ्यावरील भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे समुद्रालाही उधाण आलं आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील उरणजवळ गुरुवारी एक मासेमारी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली.

ही बोट गुजरातमधील मासेमारांची असल्याचे समोर आले आहे. पावसाच्या तडाख्यात आणि जोरदार लाटांमध्ये ही बोट पाण्याने भरल्याने थेट समुद्रात बुडाली. या बोटीत एकूण सात खलाशी असल्याची माहिती मिळाली असून, सर्वांना वेळेवर रेस्क्यू करण्यात यश आले आहे.

हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव
घटनेनंतर तातडीने हेलिकॉप्टर आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर सुरू केलेल्या मोहिमेत सर्व सात खलाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण घटनेचे काही व्हिडीओही समोर आले आहेत, ज्यामध्ये दुर्घटनाग्रस्त बोट समुद्राच्या लाटांमध्ये हेलकावे खाताना दिसते आणि लाईफ जॅकेट घातलेले बचावपथकातील सदस्य खलाशांना सुरक्षित स्थळी आणताना दिसतात.

बंदी असूनही मासेमारीला प्राधान्य
सध्या समुद्र उधाणलेला असल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे. तरीदेखील काही मासेमार जीव धोक्यात घालून समुद्रात उतरत असल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी अलिबागमध्ये घडलेल्या अशाच दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर पुन्हा एकदा मच्छीमारांना इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version