मित्रानेच केला मित्राचा खून
काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंड्री हांडेवाडी रोडवरील साईगंगा सोसायटीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये एका युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली आहे. रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३, रा. बिहार) या तरुणाचा त्याच्याच मित्राने डोक्यात लोखंडी पहार घालून खून केला असून, सुरुवातीला ही बाब लपवण्यासाठी बनाव करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
२ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४:५२ वाजता किसन राजमंगल सहा (वय २०, रा. अजगारवा, बिहार) याने डायल ११२ वर कॉल करून माहिती दिली की, चार अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येऊन त्यांच्या मित्रावर हल्ला केला. रविकुमारला गादी व बेडसिट दिली नाही म्हणून त्याच्या डोक्यात लोखंडी पहार घालून गंभीर जखमी करून आरोपी पळून गेले, असे सांगण्यात आले.
या कॉलवरून काळेपडळ पोलीस ठाण्यातील मार्शल पथक व रात्रगस्त अधिकारी घटनास्थळी – उंड्री हांडेवाडी रोडवरील साईगंगा सोसायटीसमोर पोहोचले. तेथे रविकुमार हा पत्र्याच्या शेडमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. लगेच १०८ अॅम्बुलन्स बोलावण्यात आली. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
घटनेबाबत कॉल करणाऱ्या किसन याच्याकडे पोलिसांनी वारंवार चौकशी केली असता त्याच्या कथनात विसंगती दिसून आली. तसेच परिसरातील CCTV फुटेज तपासले असता, कोणतेही चार अनोळखी इसम घटनास्थळी आल्याचे निदर्शनास आले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला.
शक्यतो कॉलरच संशयित असल्याचा पोलिसांचा कयास खरा ठरला. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर किसन याने कबुली दिली की, तो व मयत रविकुमार रात्री एकत्र मद्यपान करत होते. त्या वेळी रविकुमार याने किसनला विनाकारण आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली आणि मारहाण केली. यापूर्वीही त्याने असेच वर्तन केल्यामुळे मनात राग धरून, रविकुमार झोपल्यानंतर किसनने लोखंडी पहार घालून त्याची हत्या केली.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०२/२०२५, भादंवि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विलास सुतार, सहा. पोनि अमित शेटे, पोउनि अनिल निंबाळकर व त्यांच्या तपास पथकाने केली. तपास पथकात पोलीस हवालदार प्रविण काळभोर, प्रतीक लाहीगुडे, दाऊद सय्यद, किशोर पोटे, प्रविण कांबळे, परशुराम पिसे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, सद्दाम तांबोळी, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदिप बेडीस्कर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे यांचा समावेश होता.