Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

थारने ओढत ATM मशीन लंपास करण्याचा प्रयत्न; बेल्ट तुटला आणि… सगळं CCTVत कैद!

थारने ओढत ATM मशीन लंपास करण्याचा प्रयत्न; बेल्ट तुटला आणि… सगळं CCTVत कैद!

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. थार जीपच्या मागच्या बाजूला एक बेल्ट बांधून दुसऱ्या बाजूने एटीएमला बेल्ट बांधून एटीएम उघडून नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाडीने मशीन ओढत असताना बेल्ट तुटल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. ही घटना रविवारी मध्यरात्री तीन वाजता शहानुरवाडी येथे घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील शहानुरवाडी येथे एसबीआय बँकेची शाखा आहे. ग्राहकांना नाहक त्रास नको म्हणून बँक शाखेच्या शेजारीच एटीएम मशीन आहे. दरम्यान, रविवारी रात्री ३ वाजता हे एटीएम पळवून नेण्याचा प्रयत्न काही चोरट्यांकडून करण्यात आला. सुरुवातीला चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. चोरी करताना पकडले जाऊ नये यामुळे त्यांनी सीसीटीव्ही देखील फोडले. सुरुवातीला त्यांनी स्क्रू ड्रायव्हरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर चोरट्यांनी थेट थार जीप आणली. जीपला पाठीमागून बेल्ट बांधला. दुसरा बेल्ट एटीएम मशीनला बांधला. गाडी सुरू करून वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी बेल्ट तुटला. यामुळे चोरट्यांचा एटीएम घेऊन जाण्याचा प्रयत्न फसला.

Exit mobile version