Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

निरोप समारंभात गाणं गायलं आणि तहसीलदार थेट निलंबित!

निरोप समारंभात गाणं गायलं आणि तहसीलदार थेट निलंबित!

नांदेड : उमरी तहसील कार्यालयातील निरोप समारंभात खुर्चीवर बसून गाणं म्हणणं एका तत्कालीन तहसीलदाराला महागात पडलं आहे. समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

८ ऑगस्ट रोजी प्रशांत थोरात यांची बदली लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे झाली होती. त्यांच्या जागी मंजुषा भगत या उमरी तहसीलदारपदी रुजू झाल्या. बदलीपूर्वी उमरी तहसील कार्यालयात थोरात यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी कार्यालयातील अधिकृत खुर्चीत बसून “तेरा जैसा यार कहा” हे गाणं सादर केलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाने नवा वळण घेतला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी चौकशी करून दिलेल्या अहवालानुसार शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी थोरात यांचे निलंबन केले.

मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, “शासकीय पदावर असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पदाची मर्यादा, प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या जपणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. खासगी कार्यक्रमात अशा गोष्टी मान्य असल्या तरी शासकीय व्यासपीठावर वर्तणुकीची शिस्त पाळणे गरजेचे आहे.”

या कारवाईमुळे नांदेड जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे

Exit mobile version