राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक कथित व्हिडिओ आज व्हायरल झाला असून, त्यामध्ये ते मोबाईलवर पत्ते खेळताना दिसत आहेत. या प्रकारावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकाटे यांच्याविरोधात निवेदन तटकरे यांना दिलं.
निवेदन देताना काही छावा कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोरच पत्ते फेकले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी हल्ला चढवला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर तो व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हेही मारहाण करताना दिसून येतात.
कोकाटे यांच्याविरोधात निवेदन देताना छावा संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, “हे पत्ते त्यांना द्या आणि घरी जाऊन खेळायला सांगा. विधानभवन हे कायदे करण्यासाठीचे पवित्र ठिकाण आहे. तिथे पत्ते खेळण्याऐवजी शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी. असे मंत्री पदावर राहायला नकोत, कारण यामुळे पक्षाची बदनामी होते.”
या घटनेवर प्रतिक्रिया देताना सूरज चव्हाण म्हणाले, “कोणतीही मागणी केली जात असेल, तर ती संवैधानिक मार्गाने मांडली पाहिजे. परंतु त्यांनी ज्या प्रकारे वागणूक दिली, पत्ते फेकले आणि असंवैधानिक भाषा वापरली, त्यावर कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली. तटकरे साहेबांनी शांतपणे निवेदन घेतले, समजावून सांगितले, पण तरीही त्यांनी उद्दामपणा केला.”
दरम्यान, सुनील तटकरे यांनी हा प्रकार निंदनीय असल्याचे सांगत पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे