Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

राज ठाकरेंच्या टीकेनंतर काही तासांतच मनसेची कारवाई — डान्स बारवर मध्यरात्री धडक!

राज ठाकरेंच्या टीकेनंतर काही तासांतच मनसेची कारवाई — डान्स बारवर मध्यरात्री धडक!

पनवेल तालुक्यातील कोनजवळ घडलेल्या एका घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अनधिकृत बार आणि विशेषतः डान्स बारवर जोरदार टीका केली.

“छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या या पवित्र भूमीत असे बार असू नयेत,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यासपीठावरून मांडली.

या विधानानंतर अवघ्या काही तासांतच मनसे कार्यकर्ते थेट कृतीवर उतरले. मध्यरात्री बारा वाजता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल तालुक्यातील कोन परिसरात असलेल्या ‘नाईट रायडर’ या डान्स बारवर धडक कारवाई केली. त्यांनी बारमध्ये प्रवेश करून जोरदार तोडफोड केली. साउंड सिस्टीम, काच, फर्निचर आणि इतर सामग्रीचे मोठे नुकसान करण्यात आले.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. बार चालकाने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषी कार्यकर्त्यांविरोधात कारवाईचे संकेत दिले गेले आहेत.

मनसेच्या स्थानिक नेत्यांनी या कारवाईची जबाबदारी घेतली असून, “शिवरायांच्या रायगडात अशा अनैतिक व्यवसायांना जागा नाही,” असे विधान त्यांनी केले.

Exit mobile version