Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

पुण्यात मुलाला बेदम मारहाण; सराईत गुन्हेगाराला अटक

पुण्यात मुलाला बेदम मारहाण; सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे, गहूंजे:
पुणे शहरात खून, कोयता गँग, मारामाऱ्या अशा घटनांमुळे आधीच भीतीचं वातावरण असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गहूंजे येथील नामांकित लोढा सोसायटीमध्ये एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलाला केवळ वाद झाल्याच्या कारणावरून अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीचे नाव आहे किशोर भेगडे, जो मावळचे माजी आमदार बापू भेगडे यांचा पुतण्या आहे.

ही घटना काल संध्याकाळी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये घडली. किशोर भेगडेचा मुलगा आणि त्याचे मित्र खेळत असताना किरकोळ वाद झाला. या वादाची माहिती मिळताच संतप्त किशोर भेगडेने थेट क्लब हाऊसमध्ये जाऊन मुलांना शिवीगाळ करत, एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला जबर मारहाण केली.

या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, त्यात किशोर भेगडे एका मुलाला पोटात जोरात लाथ मारताना स्पष्ट दिसतो. आजुबाजूचे लोक हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत असले तरी किशोर भेगडे आक्रमकपणे मुलांवर तुटून पडतो.

या घटनेनंतर पीडित मुलाच्या नातेवाईकांनी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, किशोर भेगडेविरोधात भादंवि कलम 307 – जीवे मारण्याचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत किशोर भेगडेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर भेगडे याच्यावर याआधीही खून, हत्येचा प्रयत्न, मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. आता पोलीस या प्रकरणात काय अधिक कारवाई करतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

📌 हा प्रकार समाजातील “भाईगिरी संस्कृती”च्या वाढत्या प्रभावाचा जळजळीत नमुना आहे आणि पोलिसांनी यावर कठोर पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे

Exit mobile version