मोबाईल ऑफ, लोकेशन बदलत राहिला… पण पोलिसांनी अखेर लावली पकड!
पुणे, काळेपडळ:
पगारासाठी आणलेले १५ लाख रुपये चोरून फरार झालेल्या चालकाला अखेर पुणे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. सलमान यासीन पठाण (वय ३२), रा. शिळफाटा, ठाणे, असा या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल होता.
सलमान पठाण हा फिर्यादीकडे चालक म्हणून काम करत असताना मालकाकडून मजुरांच्या पगारासाठी आणलेले लाखो रुपये, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि चारचाकी गाडी घेऊन फरार झाला होता. गुन्हा घडल्यानंतर तो मोबाईल बंद ठेवून सतत ठिकाणं बदलत होता. सांगली, बीड, मुंबई, ठाणे, मुंब्रा इत्यादी भागांमध्ये लपून फिरणाऱ्या आरोपीचा शोध लावणे पोलिसांसमोरील मोठं आव्हान बनलं होतं.
पोलीस हवालदार प्रतिक लाहिगुडे यांनी एका फोन कॉलचा सुराग पकडून आरोपीच्या लोकेशनचा शोध घेतला. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून आरोपीला ठाणे येथून त्याच्या मित्राच्या मदतीने अटक केली.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल १५,०६,४२०/- रुपयांचा मुद्देमाल, त्यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन व मोबाईल फोन जप्त केला आहे.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही पोलिसांची अत्यंत प्रशंसनीय आणि कौतुकास्पद कारवाई ठरली आहे.