तलवारीसह हैदोस माजवणारा गुन्हेगार ४ महिन्यांनंतर खडकी पोलिसांच्या ताब्यात

पुणे – भावावर इराणी समाजातील काही व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याचा राग मनात ठेवत तलवारीने तोडफोड करणाऱ्या आणि गेली चार महिने फरार असलेल्या राजसिंग युवराजसिंग जुनी (वय २८, रा. पाटील इस्टेट) या गुन्हेगाराला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून लोखंडी तलवारही जप्त केली आहे.

२ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता पाटकर प्लॉट (शिवाजीनगर) येथे ही घटना घडली होती. भावावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजसिंग जुनी याने आपल्या ४-५ साथीदारांसह घटनास्थळी धडक देत पार्क केलेल्या मोटारसायकल्सवर धारदार शस्त्रांनी तोडफोड केली. तसेच आरडाओरडा, शिवीगाळ करत हवेत तलवार फिरवत दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी सय्यदनूर जान शहा ईराणी (वय ५६) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या घटनेनंतर राजसिंग जुनी फरार झाला होता. दरम्यान, पोलीस अंमलदार दिनेश भोये यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पाटील इस्टेटमधील मुळा नदीच्या काठावर आरोपी बुलेट मोटारसायकलसह थांबलेला होता. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली.

ही कारवाई खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले व त्यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस अंमलदार शशी सपकाळ, प्रताप केदारी, शशांक डोंगरे, गालिब मुल्ला, सुधाकर राठोड, दिनेश भोये, अनिकेत भोसले आणि ऋषिकेश दिघे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *