रस्त्यावर धोकादायक कृत्य! धावत्या कारच्या छतावर प्रेमीयुगुलाचा स्टंट पाहून नागरिकांचा रोष
पुणे शहरातील खराडी परिसरात भर रस्त्यावर जीव धोक्यात घालून प्रेमीयुगुलाने धावत्या कारच्या छतावर बसून स्टंटबाजी व रोमान्स केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला असून, गाडी सरळ जात असताना तरुण आणि तरुणी वाहनाच्या रूफटॉपवर बसून रोमँटिक पोज देत होते. या कृतीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित झाले.
घटनेचा व्हिडिओ काही सेकंदांचा असला तरी तो मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बेजबाबदार प्रकारावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत, “हे केवळ स्वतःच्या जीवाशी खेळणे नाही, तर इतरांच्या सुरक्षिततेलाही धोका आहे,” अशी टीका केली.
कायद्यानुसार, सार्वजनिक रस्त्यावर किंवा प्रतिबंधित जागेत स्टंट करणे हा दंडनीय अपराध असून, अशा कृतीसाठी दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच, स्टंटमुळे इतरांना इजा झाल्यास गुन्हा दाखल होण्याची तरतूद आहे.
या घटनेनंतर वाहतूक नियमांचे पालन, रस्त्यावरील सुरक्षितता आणि सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या प्रकारांवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.