दिवसाढवळ्या अपहरण! तरुणीला दुचाकीवर ओढून नेताना कॅमेऱ्यात कैद
नांदेड – शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात बुधवारी दुपारी घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. भरदिवसा १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार दोन तरुणांनी केला. यातील एकाने तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेले.असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी तात्काळ हालचाल करत २१ वर्षीय मोहम्मद ख्याजा या आरोपीला देगलूर नाका परिसरातून अटक केली. त्याचा दुसरा साथीदार सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी दुपारी पीडित तरुणी रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असताना दोन तरुण दुचाकीवरून आले. अचानकपणे त्यांनी तरुणीला पकडून ओढत दुचाकीवर बसवले. तरुणीने आरडाओरड केली असता देखील उपस्थित नागरिकांनी कोणतीही मदत केली नाही, यामुळे सामाजिक जबाबदारीचाही मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ प्रतिक्रिया देत आरोपींचा पाठलाग सुरू केला. पोलिसांच्या मागावर असल्याचे लक्षात येताच आरोपींनी गोखुळनगरजवळ तरुणीला अर्ध्या रस्त्यात सोडून दिले आणि तेथून फरार झाले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पीडित तरुणी सुरक्षित मिळाली.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात तात्काळ तळ ठोकले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही घटना नांदेडसारख्या शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणते. दिवसाढवळ्या झालेला हा प्रकार समाजातील निष्क्रियतेचंही दर्शन घडवतो.