मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खंडाळा बोरघाट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची अचानक संख्या वाढल्याने खोपोली ते बोरघाट या टप्प्यात प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी तैनात आहेत.
शिंग्रोबा मंदिर ते दस्तुरी ट्रॅफिक चेक पोस्ट दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून अमृतांजन ब्रिज आणि बॅटरी हिल परिसरात वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र आहे. खंडाळा टनेलपासून खंडाळा ओव्हरब्रिजपर्यंत वाहने अक्षरशः रांगत चालली आहेत.
दरम्यान, जुना मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच खंडाळा–लोणावळा मार्गावरही वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला असून या मार्गावर सुमारे ७ ते ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाढला आहे.
वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना संयम राखण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
