महिला PSIचा राग अनावर, नेमप्लेट फेकली!
मुंबई – दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील व्ही.पी. रोड पोलिस ठाण्यात महिला उपनिरीक्षकाने (PSI) नागरिकांशी उघडपणे गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार १८ सप्टेंबर रोजी घडला असून, प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही नागरिकांसह एक महिला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आली होती. यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला उपनिरीक्षकांशी त्यांचा वाद झाला. वाद चिघळल्याने संबंधित महिला अधिकाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नेम टॅग (बॅज) काढून उपस्थित नागरिकांकडे फेकला. त्याचवेळी उपस्थित व्यक्तींनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला.
या वर्तनामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, महिला पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या या दादागिरीच्या प्रकाराची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.