“Manikrao Kokate Rummy Video: CM Fadnavis Reacts, Says ‘Not Honorable'”

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेच्या कामकाजादरम्यान मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला असून, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कोकाटेंनी दिलेलं स्पष्टीकरण पुरेसं नाही, असं सूचित करताना फडणवीस म्हणाले की, “मंत्री काहीही सांगोत, पण ते आमच्यासाठी भूषणावह नाही.”

मुख्यमंत्री म्हणाले की, “विधानसभेत गंभीर चर्चा सुरु असताना एखाद्या मंत्र्याकडून असं वर्तन होणं ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आपलं काम सभागृहात नसलं, तरी गंभीर राहणं आवश्यक असतं. कागदपत्रं वाचणं चालतं, पण रमी खेळणं चुकीचं आहे.”

कोकाटेंचा पत्ता कट होणार?

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कारवाईचा चेंडू थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोर्टात टोलावला. तटकरेंनी म्हटलं, “शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांचं असं वर्तन अयोग्य आहे.” यावरून कोकाटेंच्या मंत्रिपदावर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“मी फक्त जाहिरात स्किप करत होतो” – कोकाटेंचं स्पष्टीकरण

या प्रकरणावर माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरण देत म्हटलं की, “मी रमी खेळत नव्हतो, फक्त यूट्यूबवर जाहिरात स्किप करत होतो.” मात्र, त्यांच्या या स्पष्टीकरणावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याला उत्तर देत आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कोकाटे ऑनलाईन पत्त्यांचा खेळ खेळताना दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.

आता निर्णय अजित पवारांकडे

माणिकराव कोकाटेंवर कारवाई होणार की नाही, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. अजित पवार यांच्यावर आता दबाव वाढतोय आणि त्यांच्या निर्णयावरच कोकाटेंचं राजकीय भविष्य अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *