पक्ष्याची धडक मुळे माद्रिद-पॅरिस विमानाची आपत्कालीन लँडिंग; प्रवासी थोडक्यात बचावले
रविवारी माद्रिदहून पॅरिसकडे निघालेल्या ‘इबेरिया एअरलाइन्स’च्या ‘आयबी ५७९’ या फ्लाइटला टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच पक्ष्याची जोरदार धडक बसली. या अपघातामुळे विमानात तातडीने इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती.
धडक इतकी तीव्र होती की, विमानाच्या केबिनमध्ये धूर भरला आणि ऑक्सिजन मास्क आपोआप खाली आले. सुदैवाने पायलटने अत्यंत प्रसंगावधान राखून विमानाचं सुरक्षित लँडिंग केलं आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
लँडिंगनंतर तांत्रिक तपासणीत असे आढळले की, विमानाचा पुढचा भाग पूर्णपणे तुटलेला होता. रॅडोमचा मोठा भाग उडून गेला होता, तसेच हवामानाचा अंदाज देणारं रडार अँटेना आणि उजवं इंजिन देखील यामध्ये गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाले होते.
विशेष म्हणजे हे विमान इबेरिया एअरलाइन्सच्या ताफ्यातील अत्यंत नवीन विमानांपैकी एक होतं. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच ते सेवेत दाखल झालं होतं. सध्या हे विमान दुरुस्तीसाठी सेवाबाहेर ठेवण्यात आलं असून, तज्ज्ञांच्या मते, या प्रकारामुळे ते दीर्घकाळ वापरात आणता येणार नाही.
घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये प्रवाशांची घाबरलेली अवस्था आणि विमानाच्या पुढील भागाचं मोठं नुकसान स्पष्टपणे दिसून येत आहे.
एअर सेफ्टी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून, इबेरिया एअरलाइन्सकडून यासंबंधी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.