Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

कोल्हापूरमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, दगडफेक; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कोल्हापूरमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, दगडफेक; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर परिसरात कमानीजवळील चौकात शनिवारी रात्री उशिरा दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त लावण्यात आलेल्या फलक आणि साऊंड सिस्टिमवरून दुपारपासूनच वातावरण तापले होते. याशिवाय चौकातील वर्चस्वाच्या प्रश्नावरून दोन्ही गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

सायंकाळी हा वाद उफाळून आला आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. या दरम्यान काही संतप्त तरुणांनी परिसरातील चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड केली, तर काहींनी वाहने पेटवण्याचाही प्रयत्न केला.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कुमक मागवून जमावावर नियंत्रण मिळवले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू असल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेत जमाव पांगवला आणि काही जणांना ताब्यात घेतले.

वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाद निर्माण करणारे बॅनर पोलिसांनी उतरवले आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version