Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

अजितदादांच्या आमदाराच्या उपस्थितीत हिंजवडी पोलिसांची ग्रामस्थांवर दादागिरी

अजितदादांच्या आमदाराच्या उपस्थितीत हिंजवडी पोलिसांची ग्रामस्थांवर दादागिरी

हिंजवडी-माण परिसरातील रस्ते रुंदीकरण मोहिमेदरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांवर जोरजबरदस्ती व दादागिरी केल्याचा आरोप होत असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना हा प्रकार घडला.

ग्रामस्थांच्या मते, कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाडकाम सुरू करण्यात आले. व्हायरल व्हिडिओत एक स्थानिक नागरिक अचानक झालेल्या पाडकामाबाबत प्रश्न विचारताना दिसतो. त्यावर हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पंधरे यांनी संबंधित नागरिकाशी अरेरावीची भाषा वापरल्याचा, धमक्या दिल्याचा आणि अटक करण्याची धमकी देत शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत घडला, मात्र त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही.

हा रस्ता रुंदीकरण प्रकल्प आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमआरडीएमार्फत सुरू करण्यात आला आहे. मात्र, पूर्वसूचना न दिल्यामुळे आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.

वाढत्या विरोधामुळे आमदार शंकर मांडेकर यांनी रस्ता रुंदीकरणाची रुंदी 36 मीटरवरून 24 मीटरपर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सांगितले. या घटनेमुळे हिंजवडी-माण येथील ग्रामस्थ आणि पीएमआरडीए प्रशासन यांच्यात तणाव अधिकच वाढला आहे.

Exit mobile version