Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

ढगफुटीने धराली गावात हाहाकार; अनेक घरे व हॉटेल्स वाहून गेली

ढगफुटीने धराली गावात हाहाकार; अनेक घरे व हॉटेल्स वाहून गेली

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात अचानक ढगफुटी झाल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच हाहाकार माजला. डोंगरावरून आलेल्या प्रचंड मातीच्या ढिगाऱ्याने गावात सैलाबासारखा कहर माजवला आहे. या भीषण घटनेमुळे खीरगंगा नदीला पूर आला असून, राली बाजारसह आजूबाजूच्या अनेक भागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

या घटनेमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून, काही नागरिक अजूनही अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने तत्काळ कारवाई करत SDRF, लष्कर आणि पोलीस दल घटनास्थळी पाठवले आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून, अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

जलप्रलयाचं थरारक दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना दिसले, काहींनी तर किंचाळत मदतीसाठी हाका मारल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू असून, हवामान खात्याकडून आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता आपत्कालीन यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आलं आहे.

Exit mobile version