कृषी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करून “कृषी मंत्र्यांना घरी बसवा” अशी ठाम मागणी करणारे अखिल भारतीय छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले समस्त शेतकरी बांधव राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या कार्यकर्त्यांच्या रोषाचा बळी ठरले. या कार्यकर्त्यांनी शेतकरी नेत्यांवर आणि उपस्थित शेतकऱ्यांवर मारहाण करत थेट लोकशाही प्रक्रियेलाच हादरा दिला आहे.
विजयकुमार घाडगे पाटील यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले, मागणी केली – तर तुमचं उत्तर लाठ्या-काठ्यांमध्ये? हे केवळ शेतकऱ्यांचा अपमान नाही, तर समाजाच्या प्रत्येक कष्टकऱ्याचा आणि लोकशाही मूल्यांचा अपमान आहे.”
घटनेनंतर राज्यातील विविध शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. “जर प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर ही लोकशाही राहिलीच कुठे?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छावा संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी शासनाकडे केली आहे.