रेल्वे स्थानकात प्रवाशाचा गोंधळ; कार्यालयात तोडफोड.
मुंबई : बोरिवली रेल्वे स्थानकावर शनिवारी दुपारी एका प्रवाशाने आक्रमक वर्तन करत तिकीट तपासनीसांच्या कार्यालयात तोडफोड केली आणि रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. ही घटना दादर-विरार लोकलमधून चार प्रवाशांना उतरवण्यात आल्यानंतर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवाशांपैकी तीन जण सेकंड क्लासचे तिकीट घेऊन फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करत होते, तर चौथा प्रवासी पूर्णपणे बिनतिकीट होता. तपासणीनंतर त्यांना गाडीतून उतरवण्यात आलं. यानंतर एक प्रवासी संतप्त झाला आणि त्याने तिकीट तपासनीसांच्या कार्यालयात घुसून तोडफोड सुरू केली. काही कर्मचाऱ्यांवर शारीरिक हल्लाही करण्यात आला.
घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपी प्रवाशाचा शोध सुरू आहे.