बदलापूरमध्ये भीषण अपघात! ट्रकने कारला चिरडले; दोन जणांचा मृत्यू

बदलापूर | २ ऑगस्ट २०२५ – बदलापूर येथील वालीवली परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मालवाहू आयशर ट्रकने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रकमध्ये लादी भरलेली असून तो एरंजाडळच्या दिशेने जात होता. वालीवलीतील तीव्र उतारावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक बसली.

अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमध्ये तीन ते चार जण अडकले होते. स्थानिकांनी तातडीने मदत करत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आणखी एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, आयशर ट्रकने इतर दोन ते तीन वाहनांनाही धडक दिल्याने आणखी काही जण जखमी झाले आहेत. अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *