Cloudburst-Like Rain Hits Akola’s Paras Village; Flooding Damages Homes and Property
अकोला, २२ जुलै: अकोला जिल्ह्यातील पारस आणि आजूबाजूच्या पाच-सहा गावांमध्ये आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला. पहाटेपासून सकाळी सात वाजेपर्यंत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
गावांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, नागरिकांना घरातील साहित्य वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. काही कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असून, नागरिक घाबरलेल्या अवस्थेत आहेत.
पाण्याचा वेग इतका होता की काही घरांच्या परिसरात अडीच ते तीन फूटांपर्यंत पाणी साचले. गावकरी मोठ्या प्रमाणावर घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या आपत्कालीन परिस्थितीवर बाळापुरचे तहसीलदार लक्ष ठेवून आहेत आणि प्रशासन सतर्क आहे.
स्थानिक प्रशासनाकडून मदतीचे प्रयत्न सुरू असून, गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम देखील सुरु झाले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र आहे.