पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस; सात कुत्र्यांच्या टोळक्याचा तरुणावर हल्ला
पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांची दहशत समोर आली आहे. चिखलीतील मोरे वस्ती परिसरात आज पहाटे साधारण पाचच्या सुमारास कामावर जाणाऱ्या एका तरुणावर तब्बल सात कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला चढवला. हा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे.
स्वतःचा बचाव करण्यासाठी तरुणाने फ्लेक्स बोर्ड आणि दुचाकीचा आधार घेतला. त्याने दुचाकी कुत्र्यांकडे ढकलूनही टोळकं हटण्यास तयार नव्हतं. शेवटी नागरिक घराबाहेर आल्यानंतरच कुत्रे मागे हटले. मात्र ते लगेच परिसरातून निघून गेले नाहीत आणि आसपास घुटमळत राहिले.
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीरपणे पुढे आला आहे.