मुंबई: रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकल्याला कारने चिरडले; गंभीर जखमी

मुंबई : कंजूरमार्ग एमएमआरडीए कॉलनीमध्ये रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकल्याला कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून, अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीसीटीव्हीवरील वेळेनुसार, हा प्रकार ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारे ४:४३ वाजता घडला. व्हिडिओमध्ये दिसते की, एक लहान मुलगा रस्त्याच्या कडेला खेळत असतो, तर एक ग्रे रंगाची सॅन्ट्रो कार अरुंद रस्त्यावर वळण घेत असते. त्यावेळी मुलगा रस्त्याच्या अतिशय जवळ बसून खेळत असतो.

कार वळून झाल्यानंतर मुलगा चालायला सुरुवात करतो आणि थेट कारच्या समोर येतो. ड्रायव्हरच्या नजरेत न आल्याने तो मुलगा कारच्या चाकाखाली सापडतो. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक तात्काळ धावत येतात. त्यानंतर ड्रायव्हरने कार रिव्हर्स घेतली आणि मुलाला बाहेर काढण्यात आले.

विविध अहवालानुसार, जखमी मुलाला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो गंभीर जखमेतून सावरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *