मुंबईत रस्ता क्रॉस करताना भरधाव बाईकची धडक, व्यक्तीचा जागीच मृत्यू
मुंबईच्या सांताक्रुझ पश्चिम येथील एसएनडीटी कॉलेजसमोर शनिवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या बाईकने रस्ता क्रॉस करत असलेल्या 39 वर्षीय गणेश लखन शाह यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की ते काही फूट दूर फेकले गेले. तातडीने रुग्णालयात नेले असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर लगेचच सांताक्रुझ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी बाईक चालक किनन मिसकिटा (वय 21, रा. जुहू कोळीवाडा) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार पाहता, वाहतूक नियंत्रण आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.