कोंढवा: काम करून उपकार दाखवणाऱ्या नगरसेवकांची जनतेकडून चांगलीच खरडपट्टी!


कोंढवा, प्रतिनिधी:
कोंढव्यातील काही माजी नगरसेवक व त्यांचे समर्थक आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची जाणीव नागरिकांना करून देत आहेत. पाणीपुरवठा, लाईट, ड्रेनेज, रस्ते यांसारखी मूलभूत कामं करून त्यांनी प्रभागातील जनतेवर “उपकार” केल्याचा अविर्भाव निर्माण केला जात आहे. मात्र ही वृत्ती अत्यंत निंदनीय व लोकशाहीचा अपमान करणारी आहे, अशी टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नगरसेवकांची निवड ही जनतेच्या सेवेसाठी होते, उपकारासाठी नाही. विकासकामांसाठी लागणारा निधी हा सरकार देत नसून नागरिकांनी भरलेल्या कर, पाणीपट्टी, गनिमी जमीन भाडे, जाहिरात शुल्क व इतर शासकीय उत्पन्नाच्या माध्यमातून मिळवला जातो. त्यामुळे नागरिकांच्या पैशातून कामे करणे ही नगरसेवकांची जबाबदारी असते, उपकार नव्हे.

यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या नगरसेवकांच्या वागणुकीकडे स्थानिक *आमदार आणि खासदारांनीही लक्ष द्यावे,* अशी जोरदार मागणी होत आहे. जर त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी नागरिकांवर उपकार केल्याची भाषा करत असतील, तर याचे दायित्व स्थानिक लोकप्रतिनिधींवरही आहे. अशा प्रकारच्या मानसिकतेला पाठीशी न घालता, त्यांनीच आपल्या नगरसेवकांना लोकशाहीतील कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याची जाणीव करून द्यायला हवी.

स्थानिक जनतेने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आपण कोणती कामे केली याची जाहिरात करण्याआधी नगरसेवकांनी हे लक्षात ठेवावे की ती कामे करण्यासाठी तुम्हाला निवडून देण्यात आले होते. ती जबाबदारी होती, दया नव्हे.”

शेवटी, नागरिकांनी इशारा दिला आहे की, “सोशल मीडियावर श्रेय लाटण्याआधी काम किती दर्जेदार झालं हे जनतेला विचारा.”
जागरूक मतदार आता अशा प्रकारच्या ढोंगी प्रचाराला बळी न पडता विचारपूर्वक निवड करत आहेत.

#लोकशाहीचे_खरे_रक्षक_मतदार
#आमदार_खासदार_जवाब_द्या
#कोंढवा_मधील_सजग_नागरिकांचा_आवाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *