मुंबई – मानखुर्द परिसरात एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. ११ वर्षांच्या हमजा या चिमुकल्यावर पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हल्ल्यात हमजा गंभीररीत्या जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना मुद्दाम घडवण्यात आली असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहैल खान नावाच्या व्यक्तीने पिटबुलच्या साहाय्याने हमजाला घाबरवले आणि त्यानंतर कुत्र्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले. परिणामी, कुत्र्याने हमजावर जबरदस्त हल्ला केला.
या घटनेचा व्हिडीओ कैद झाला असून, तो पाहून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सध्या पोलीस अधिक तपास करत असून, पिटबुलच्या मालकावर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.